| Barshi Vishesh Digital Newspaper |
बार्शी विशेष : केंद्र सरकारने मार्च २०२६ पासून घरगुती गॅस सिलेंडर नोदणी करण्याकरितां शहरी भागासाठी २५ दिवस तर ग्रामीण भागासाठी ४५ दिवसांचा प्रतिक्षा कालावधी लागू केला आहे. बार्शी शहरात 'भारत गॅस'चे दोन वितरक असून सिलेंडर मिळण्याबाबत दोन्हीकडे वेगवेगळे नियम लागू आहेत.
ए. आर. कोठारी गॅस एजन्सीकडील ग्राहकांना २५ दिवसानंतर सिलेंडर मिळतो, तर मोहिते भारत गॅस एजन्सीकडील ग्राहकांना ४५ दिवसानंतर मिळतो. त्यामुळे सिलेंडर बुकींगसाठी दोन नियम लागू असलेले बार्शी शहर राज्यातील किंवा देशातील बहुदा एकमेव शहर असावे असे म्हटले तरी वावगे ठरु नये.
एकाच शहराच्या हद्दीत दोन नियम लागू का? याचे उत्तर मात्र ना 'भारत पेट्रोलीयम कॉर्पोरेशन लि.' (बीपीसीएल) कडे आहे ना जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडे. आणि जरी असले तरी याबाबत त्यांनी अद्यापही 'मौन' धारण केले आहे. परिणामस्वरुपी मोहिते भारत गॅस एजन्सीकडील ग्राहकांना चुलीवर स्वयंपाक करण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सिलेंडर बुकींगच्या दोन नियमाबाबत बीपीसीएल तसेच जिल्हा व स्थानिक प्रशासनाने मौन धारण करण्याची घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. केवळ शासकीय कार्यालयात 'ग्राहक दिन' साजरा करुन प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, किंवा गॅस वितरकांसोबत मिटींग घेऊन ग्राहकांच्या समस्या सुटत नाहीत. ग्राहक हित जपायचे असेल तर प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन 'अॅक्शन मोड'वर येणे गरजेचे आहे.
सिलेंडर बुकींगच्या दोन नियमाबाबत काही अनुत्तरीत प्रश्न
१) बार्शी शहरातील मोहिते भारत गॅस एजन्सी चा वितरक परवाना 'शहरासाठी' की 'ग्रामीण भागासाठी' ?
२) कोठारी गॅस एजन्सीच्या ग्राहकांना २५ दिवसानंतर सिलेंडर मिळतो तर मग मोहिते गॅस एजन्सीच्या ग्राहकांना का मिळत नाही ?
३) एकाच शहराच्या हद्दीत २५ आणि ४५ दिवस प्रतिक्षा कालावधीचा नियम कसा लागू केला जाऊ शकतो ?
४) पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने एकाच शहरात असे दोन नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत का?
५) मोहिते भारत गॅस एजन्सीकडील ग्राहकांना २५ दिवसानंतर सिलेंडर मिळत नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे, या त्रासाला जबाबदार कोण? ग्राहकांना झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासाची नुकसान भरपाई कोण देणार?
चार दिवसांत सिलेंडर नाहीच...
नोंदणी केल्यापासून चार दिवसात ग्राहकांना घरपोच सिलेंडर देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात वितरकांना दिलेले असतानाही बार्शीतील 'ए. आर. कोठारी गॅस एजन्सी' कडे नोंदणी केलेले सिलेंडर ७ दिवसानंतरही मिळाले नसल्याच्या काही ग्राहकांच्या तक्रारी आहेत. आवश्यक तितका सिलेंडरचा साठा उपलब्ध होत नाही, कामगार सुट्टीवर आहे अशा सबबी सांगतात.
