बार्शीत फायनान्स कंपनीच्या नावाखाली लुटणारी टोळी गजाआड

0

barshi-finance-extortion-gang-arrest
अटक केलेल्या दोन आरोपींसह बार्शी तालुका पोलिस पथक

 बार्शी विशेष : फायनान्स कंपनीचे नाव सांगून लुटणाऱ्या दोघांना बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत सुनील रसाळ (वय २६) रा. तुळजापूर रोड, मांगडे चाळ, बार्शी आणि ओंकार दीपक परदेशी (वय २८) रा. भवानी पेठ, बार्शी अशी त्यांची नावे आहेत. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील दहिफळ येथील रहिवासी सतीश विजयराव हावळे हे आपल्या मुलाच्या मोटारसायकल (क्र. एमएच-२५ बीसी-३८८३) वरून औषधे आणण्यासाठी बार्शीकडे येत असताना, कुसळंब टोलनाक्याच्या पुढे एम.पी. पेट्रोल पंपाजवळ दोन अज्ञात इसमांनी त्यांना पाठीमागून येऊन आडवले. आणि जबरदस्तीने चावी काढून घेऊन या गाडीवर फायनान्सचे कर्ज असून ती जप्त करावी लागेल अशी भीती दाखवून बारा हजार रुपयांची मागणी केली. त्यावर घाबरुन फिर्यादीने फोन पे आणि रोख स्वरूपात दहा हजार रुपये त्यांना दिले. आरोपींनी त्याची कोणतीही पावती दिली नाही. मोटरसायकलची चावी परत घेत असताना आरोपींनी फिर्यादीच्या बोटातील एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दमदाटी केली.


या घटनेनंतर सतीश हावळे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि महेश माने आणि त्यांच्या पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोघांना ताब्यात घेतले. 


ही कारवाई उपनिरिक्षक भालेराव, सपोफौ गवळी, हवालदार उंदरे, खांडेकर, बोबडे, घाडगे, देशमुख, कावळे, पोकॉ बचुटे, दासरे, लोंढे, चिट्टलवाड यांनी केली.


याप्रकारे इतर कोणाची फायनान्स कंपनीच्या बनावट एजंटकडून लूट झाली असेल, तर त्यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीसांनी केले आहे. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)