| Barshi Vishesh Digital Newspaper |
बार्शी विशेष : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पा मसाज सेंटरच्या आडून चालणाऱ्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन १० जणांना अटक केली.
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
यादरम्यान बार्शी-लातूर बायपास रोडवरील नागोबाचीवाडी गावच्या हद्दीत असलेल्या लक्झरी डिलक्स स्पा मसाज सेंटरमध्ये अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती बार्शी तालुका पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने या स्पा सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी तिथे १० लोक पैशांची पैज लावून तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड, जुगाराचे साहित्य आणि वाहने असा एकूण १२ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर जुगार अड्डा आकाश काशिद आणि स्पा सेंटरचा मॅनेजर बाबु चौधरी हे चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी स्पा मालक, मॅनेजर आणि जुगार खेळणाऱ्या इसमांविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि महेश माने, पोहेकॉ सोमनाथ खांडेकर, पोकॉ सुरेश बिरकले, महमदगौस मेहंदी आणि लक्ष्मण चिट्टलवाड यांनी केली.
