सातबारा नोंदीसाठी लाच घेणारा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; बार्शी तालुक्यातील घटना

0

 

barshi-acb-trap-mandal-adhikari-bribe-case

बार्शी विशेष : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारस म्हणून आजीचे नाव नोंद होण्याकरिता उताऱ्याचे लॉक काढून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहाथ पकडले. हेमंत चंद्रकांत फुलारी (वय ५३ ) नेमणूक उपळे (दु), ता. बार्शी असे या अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे.


यातील तक्रारदाराच्या आजीचे वडील मयत झाले होते. त्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदाराच्या आजीचे नाव वारस म्हणून नोंदवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. तलाठी यांनी घातलेली ही नोंद प्रमाणित करण्यासाठी आणि सातबारा उताऱ्याचे लॉक काढून देण्यासाठी (अनलॉक करणे) आरोपी हेमंत फुलारी यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.


तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आज, २८ एप्रिल २०२६ रोजी पडताळणी केली असता, फुलारी यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून ही लाचेची रक्कम स्वीकारताना फुलारी यांना ताब्यात घेण्यात आले. 


सदरची कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि सोलापूर एसीबीचे पोलीस उपाधिक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार, रवींद्र लांभाते व त्यांच्या पथकाने केली.


वैराग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासकीय कामासाठी कुणीही लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपाधिक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)