| (AI Image) |
बार्शी विशेष : उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांचे आदेशानुसार, बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे हॉटेल राजवाडाच्या पाठीमागे बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी दारू आणि बिअरची विक्री करणाऱ्या एका इसमावर निर्भया पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ८,६५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून धनवंत संदिपान कोंढारे (वय ४५) रा. चिखर्डे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
निर्भया पोलीस पथक १६ मे २०२६ रोजी पांगरी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, बार्शी ते धाराशिव रोडवरील हॉटेल राजवाडाच्या मागे एक जण विनापरवाना दारू विकत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह दुपारी २ वाजून १० मिनिटांच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. तिथे धनवंत कोंढारे एक पांढरी पिशवी घेऊन बसलेले आढळले.
पोलिसांनी पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे मास्टर डिलाईट, क्लासिक गोल्ड कंपनीच्या दारूच्या बाटल्या, तसेच किंगफिशर, बडवायझर मँगनम, बडवायझर माईल्ड, टुबर्ग आणि ब्रोकोड कंपनीच्या बिअरच्या बाटल्या असा एकूण ८,६५५ रुपयांचा बेकायदेशीर साठा मिळून आला. चौकशीत दारू विक्रीबाबत परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सर्व माल जप्त केला.
याप्रकरणी बार्शी निर्भया पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पाडुळे यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास हवालदार शब्बीर शेख करत आहेत.
