भरदिवसा रस्त्यात पत्नीची हत्या करणारा पती तालुका पोलिसांच्या अटकेत

0

हत्या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपीसमवेत बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी

बार्शी विशेष : चारित्र्याच्या संशयावरून बार्शी परांडा रोडवरील प्रवीण हॉटेलजवळ पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना २५ मे २०२६ रोजी सकाळी घडली.


धनश्री ऋषीकेश पाटील असे मृत महिलेचे नाव असून, ती सकाळी सव्वादहाचे सुमारास बचत गटाचे काम संपवून लक्षाचीवाडी येथून ज्युपीटर गाडीवरून (क्र.एमएच १३ एफए ४०१६) बार्शीकडे परतत असताना, पती ऋषीकेश संभाजी पाटील (रा. नागणे प्लॉट, बार्शी) याने तिला रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने गळा, मान आणि पोटावर वार केले.


ही माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी जखमी धनश्रीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी मयतेचे वडिल जितेंद्र विश्वनाथ गायकवाड (वय ५६) रा. कासारवाडी, ता. बार्शी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या घटनेनंतर, तालुका पोलिसांनी तातडीने दोन पथके रवाना करून आरोपी पतीला अटक केली असून, फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉड पथकाच्या मदतीने वैज्ञानिक पद्धतीने आरोपीने गुन्ह्यात वापरलेले आणि  लपवून ठेवलेले हत्यारही जप्त केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)