| Barshi Vishesh Digital Newspaper |
बार्शी विशेष : हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करुन बार्शी तालुका हद्दीत वावरणाऱ्या एका तरुणास बार्शी तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. तथागत मुकेश मस्के (वय २४), रा. भीमनगर, बार्शी असे त्याचे नाव आहे.
७ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असलेल्या पोलीस पथकास जामगांव येथील बाळराजे चौक परिसरात एक हद्दपार तरुण फिरत असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर पोलीसांनी तेथे जाऊन सदर तरुणास ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत आणि सोलापूर व धाराशिव जिल्हा हद्दपारी आदेशाचे त्याने उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बार्शी तालुका पोलिसांनी त्याचेविरोधात मपो अधिनियम १९५१ चे कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गोळीबाराची अफवा...
जामगाव चौकात झालेल्या वाहनांच्या अपघातानंतर दोन परिचितांमध्ये झालेल्या वादात गोळीबार झाल्याची चर्चा होती. मात्र पोलिस तपासात यामध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
