Barshi Vishesh Digital Newspaper
बार्शी विशेष : बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) तथा स. पो. अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा यांनी सुरु केलेल्या अवैध धंद्यावरील धडक कारवाई मोहिमेअंतर्गत बार्शी उपविभागाच्या निर्भया पथकाने बार्शीतील तेल गिरणी चौकात सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्येमाल जप्त केला असून सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दि. २७ मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तेल गिरणी चौकातील रमाकांत पिसे यांच्या सायकल दुकानाच्या आडोशाला मुंबई कल्याण नावाचा मटका जुगार सुरू असल्याची माहिती निर्भया पथकाला मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी गणेश सोमनाथ पिसे (वय ३३), सुदेश पांडुरंग कोळपे (वय ३६), विजय दत्ता गवळी (वय २८), अमोल भास्कर पवार (वय ४२, सर्व रा. बार्शी), दिनकर अर्जुन कांबळे (वय ४४, रा. कळंब, जि. धाराशिव) आणि अजिंक्य श्रीकांत पिसे (रा. बार्शी) हे मटका खेळताना आणि खेळवताना रंगेहात मिळून आले.
या कारवाईत पोलिसांनी २२ हजार ५० रुपयांची रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, पावती पुस्तके, कॅल्क्युलेटर आणि १ लाख ५९ हजार ५०० रुपये किमतीचे पाच महागडे मोबाईल फोन असा एकूण १ लाख ८२ हजार ६१० रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी निर्भया पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत लिंबाजी पाडुळे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे बाबासाहेब घाडगे, हनुमंत पाडुळे, नम्रता गटकूळ आणि चालक भाऊसाहेब महानोर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साठे करत आहेत.
