बार्शीत साडेसात लाखांचे नकली बियाणे जप्त; कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

0


solapur agriculture department team inspecting seized bogus urad seeds in barshi warehouse
बार्शीत जप्त केलेले नकली बियाणे आणि कृषी विभागाचे अधिकारी


बार्शी विशेष : नकली बियाणे साठविलेल्या बार्शीतील गोदामावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून तब्बल ७ लाख ५२ हजार ६४० रुपयांचे नकली उडीद बियाणे जप्त केले.. ही कारवाई २६ मे २०२६ रोजी दुपारी चारचे सुमारास करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) चे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या 'NUL 7' (विश्वास) या उडीद बियाणांच्या बॅगची हुबेहूब नक्कल केलेले बोगस बियाणे, बार्शी येथील स्वराज कॉलनीतील एका गोदामात ठेवले होते. याविषयीची गोपनीय माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला मिळाल्यानंतर तातडीने तेथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत गोदामातील २१६ बॅग आणि त्यांनी आधीच विक्री केलेल्या १६८ बॅग, अशा एकूण ३८४ बॅग (प्रति ५ किलो) जप्त करण्यात आल्या.


ही कारवाई सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्रचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे आणि कुर्डुवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाने केली. या पथकात बार्शीचे तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अतुल जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, गुण नियंत्रण अधिकारी किशोर अंधारे, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील, निर्मल कंपनीचे प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी आणि बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सचिन देशमुख यांचा समावेश होता. 


या कारवाईमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी संभाव्य फसवणुकीपासून वाचले असून, या प्रकरणी बोगस बियाणे विक्रेत्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)