| Barshi Vishesh Digital Newspaper |
बार्शी विशेष : येथील मार्केट यार्डातील भागीदारीच्या वादातून व्यापारी विकास महादेव गुळमिरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी संजय लक्ष्मण केवळे यांची बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गाळा क्रमांक २ मध्ये मृत विकास गुळमिरे व आरोपी संजय केवळे भागीदारीत भुसार मालाचा व्यवसाय करत होते. मात्र, व्यवसायातील आर्थिक व्यवहार, हिशोबातील मतभेद आणि मानसिक त्रासाला कंटाळून विकास गुळमिरे यांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी दगड खाणीत उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृताच्या पत्नी वैशाली गुळमिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येपूर्वी मृत व्यक्तीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर संदेश पाठवून आरोपीला जबाबदार धरल्याचा मजकूरही समोर आला होता.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्यात आला. बचाव पक्षाने मांडलेली पुराव्यांची साखळी, घटनाक्रमातील विसंगती आणि आत्महत्येस थेट प्रवृत्त केल्याचे ठोस पुरावे नसल्याचा मुद्दा न्यायालयाने ग्राह्य धरला. आरोपीविरुद्धचा आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे नमूद करत न्यायालयाने संजय केवळे यांची निर्दोष मुक्तता केली. तसेच तपासादरम्यान जप्त केलेला मोबाईल मूळ मालकास परत करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. महेश जगताप, ॲड. राहुल कसबे व ॲड. केदार पाटील यांनी, तर सरकार पक्षातर्फे ॲड. डी. डी. देशमुख यांनी काम पाहिले.
