रोलर खाली दबून मुलाचा दुर्दैवी मृत्यू; प्रशिक्षकांसह आयोजकांवर गुन्हा दाखल

0

बार्शीतील धक्कादायक घटना रोलर खाली दबून मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Barshi Vishesh Digital Newspaper

बार्शी विशेष : बार्शीतील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या समर क्रिकेट कॅम्पमध्ये पिचवर रोलर ओढत असताना त्याखाली दबून १५ वर्षीय निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी (वय १५, रा. सुभाष नगर, बार्शी) असे त्याचे नाव आहे. 


याबाबत मुलाचे वडील योगीराज नारायण चौधरी (वय ४५) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोलर चालविण्यासाठी मोठा माणूस किंवा तंत्रज्ञ न ठेवता प्रशिक्षक व आयोजक मुलाच्या मृत्युस कारणीभूत झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. 


दिलेल्या फिर्यादीनुसार, बार्शी येथील शिवशक्ती मैदानावर 'मातृभूमी प्रतिष्ठान' आणि 'बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन' यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी 'समर क्रिकेट कॅम्प'चे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पसाठी आरव चौधरी याने प्रवेश घेतला होता. तो दररोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत मैदानावर सरावासाठी जात होता. त्याठिकाणी विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे दोघे मुलांना क्रिकेटचे मार्गदर्शन करुन सराव करून घेत होते.


शनिवारी, ३० मे २०२६ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे आरव क्रिकेट कॅम्पमध्ये सरावासाठी गेला होता. सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास, मैदानावर ट्रेनर, संबंधित प्रतिष्ठानचा कोणीही मोठा माणूस किंवा तंत्रज्ञ हजर नव्हते, मुले रोलर ओढताना दोन्ही कोच दूर थांबले होते. 


प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून आरव व इतर काही मुले रोलर ओढत असताना अचानक आरवचा तोल जावून तो खाली पडल्याने त्याच्या अंगावर पायापासून छातीपर्यंत रोलर गेला. यामुळे आरवच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव होऊन तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तत्काळ बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम, अक्षय देबडवार, मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे आणि सर्व संचालक मंडळ तसेच बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सर्व संचालक मंडळाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे करत आहेत. 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)