| प्रतिबंधित 'मांगूर' मासे (Clarias gariepinus) |
बार्शी विशेष : मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या प्रतिबंधित 'मांगूर' (Clarias gariepinus) माशांची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो बार्शी तालुका पोलिसांनी नागोबाचीवाडी शिवारात पकडला. या कारवाईत पोलिसांनी ३ हजार किलो जिवंत मासे आणि टेम्पो मिळून १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले. सोलापूरच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर हे मासे प्रशासनाच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पथक २२ मे रोजी रात्रगस्तीवर असताना, पहाटे दोनचे सुमारास बार्शी बायपास रोडवरील नागोबाचीवाडी शिवारातील परांडा चौकाजवळ एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (क्र. केए-५२-बी-४६८७) संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता, टेंपोच्या मागील भागात काळ्या रंगाच्या ताडपत्रीचा कृत्रिम हौद तयार करून त्यातील पाण्यातून जिवंत माशांची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी टेंपो चालक संदीप बारातीलाल कुमरे (वय ३५) व त्याचा साथीदार सत्येंद्रकुमार दशरथ इरपाची (वय २९) दोघेही रा. लखनादोन, जि. सिवनी, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान हे मासे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून मध्यप्रदेशातील भोपाळ येथे विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली.
बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७५, ३(५) सोबतच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
तालुका पोलिसांनी पहाटे २ वाजता कारवाई करुन रात्री ८ वाजता गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहाटे आरोपी पकडल्यापासून त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना १८ तासांचा विलंब का लागला? यादरम्यानचे काळात काय घडले? पोलिसांवर कुणाचा दबाव होता का? की आणखी काही 'वेगळेच' कारण होते? असे अनेक प्रश्न या विलंबासंदर्भात नागरिकांकडून उपस्थित केले जात असून, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
