Man arrested for stealing bag worth 91 thousand from grocery store
बार्शी विशेष: किराणा दुकानात खरेदीचा बहाणा करुन काऊंटरवर ठेवलेली बॅग पळवून नेणाऱ्या संशयितास शहर पोलिसांनी अटक केली.
किराणा दुकानात एक अनोळखी इसम येऊन खरेदी करण्याचा बहाण्याने दुकानातील काऊंटरवर ९१ हजार रक्कम ठेवलेली बॅग नजर चुकवून चोरुन नेल्याची फिर्याद रमेश जवरीलाल बाफना (रा. लक्ष्मीनगर, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. ७ मे २०२५ रोजी सकाळी १० चे सुमारास ही घटना घडली होती. यासंदर्भात शहर पोलिसात गु.र.नं.४४८/२०२५ प्रमाणे अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.
१५ ऑक्टोबर रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक बार्शी शहरातील उपळाई रस्ता परिसरात गस्त घालत असताना, सदर गुन्ह्यातील वर्णनाशी साधर्म्य असलेला एक इसम तोंड बांधून मोटरसायकलवरुन संशयास्पदरित्या फिरताना दिसला. त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेऊन चौकशी केली असता, नाव पत्ता सांगण्यास नकार देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. पथकाने त्याला पोलिस ठाण्यात आणून तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर, हवालदार माने, साठे, पोना मुळे, पोकॉ मुठाळ, उदार, जाधव, पवार, देशमुख, शेख, उघडे, भांगे यांनी केली.