| गुळपोळीतील मुक्या प्राण्यांची जलसेवा |
बार्शी विशेष : तापमानाचा पारा चढू लागल्या की माणसांप्रमाणेच मुके प्राणीही पाण्यासाठी दाहीदिशांची भटकंती करतात. पाण्यावाचून मुक्या जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील भैरवनाथ चौधरी यांनी मागील तीन वर्षांपासून एक उपक्रम सुरु केला आहे. परिसरातील गायी, म्हशी, बैल, शेळ्या-मेंढ्या यासारख्या मुक्या प्राण्यांसाठी ते हौदामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवतात. सेवाभावी वृत्तीने आजही सुरु असलेला त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
हौदात फक्त पाणी भरुन न ठेवता मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी दर तीन-चार दिवसांनी ते हौद स्वच्छ करतात. वाढत्या उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके अधिक बसतात अशा ग्रामीण भागात त्यांनी सुरु केलेली 'जलसेवा' पशुपालकांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
मुक्या प्राण्यांची तहान भागवणे हे परमेश्वर सेवेसारखेच आहे. हीच खरी समाजसेवा असून समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. - भैरवनाथ चौधरी
जलसेवेसोबतच 'महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या' माध्यमातून महिलांसाठी आरोग्य शिबिरे, कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, आजी-माजी सैनिकांचा सत्कार, स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा गौरव, आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान, जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिलांचा गौरव, अनाथालयांना धान्य पुरवठा, महापुरासारख्या आपत्तीत मदतीचा हात, १२५ नागरिकांना मोफत आधार कार्ड, इफ्तार पार्टीचे आयोजन असे विविध उपक्रम राबविल्याचे आणि स्वतःच्या लग्न पत्रिकेमधून जात-पात निर्मूलन, पाणी बचत, बेटी बचाओ-बेटी पढाओ, रक्तदान, नेत्रदान, स्वच्छ भारत, पर्यावरण रक्षण यासारखे सामाजिक संदेश दिल्याचे चौधरी सांगतात.
