आजच्या ठळक घडामोडी | शुक्रवार दि. ६ मार्च २०२६

Admin
0

 

Historic decision for Solapur: CM approves Government Engineering College; admissions to start from June
CM approves Government Engineering College; admissions to start from June


आजच्या ठळक घडामोडी | शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ (Breaking News)


 राज्यसभा निवडणूक २०२६:

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजप कडून रामराव वडकुते आणि माया इवनाते, शिवसेना (शिंदे गट) कडून सोलापूरच्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांनी अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीतर्फे शरद पवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे रामदास आठवले रिंगणात आहेत. कांते सयाना आणि उमेश मेहत्रे यांनी अपक्ष अर्ज भरले असले तरी, सूचक आणि अनुमोदक म्हणून १० आमदारांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. अर्जांची छाननी आज होणार असून, १६ मार्च रोजी अधिकृत घोषणा केली जाईल.


 सोलापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय:

सोलापूरकरांच्या गेल्या ६० वर्षांपासूनच्या मागणीला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाला दिले आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून, येत्या जून २०२६ पासूनच याचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.


 सोलापूर महानगरपालिका:

सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाची निवड आज सकाळी ११ वाजता होणार आहे. भाजपच्या रंजिता चाकोते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. १६ सदस्यांच्या समितीत भाजपचे १४ सदस्य असल्याने त्यांचे वर्चस्व कायम आहे.


 राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या:

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह ९ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.


 ई-चलन आणि इतर कायदे:

ई-चलन रद्द करण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने वाहतूकदारांनी आपला राज्यव्यापी संप मागे घेतला आहे. तसेच, विधानसभेत महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था विधेयक मंजूर करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना आता दंड आकारला जाणार आहे.


 अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचा गौरव:

ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा दिल्याबद्दल अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते डॉ. अशोक राठोड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


 सोलापूर तापमान वाढ:

सोलापुरात उन्हाचा तडाखा वाढला असून काल गुरुवारी (५ मार्च) यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २०.७ अंश सेल्सिअस इतके होते.


 क्रीडा:

भारतीय संघाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत चौथ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताच्या २५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २४६ धावाच करता आल्या.


स्त्रोत : सोलापूर आकाशवाणी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)