सामाजिक सलोखा राखा; शांतता कमिटी बैठकीत पोलिसांचे आवाहन

0

 

बार्शी शहर पोलीस ठाणे शांतता समिती बैठक २०२६ (Barshi Police Peace Committee Meeting).
Barshi Police Peace Committee Meeting

बार्शी  विशेष : आगामी काळात येणारे शिवजयंती उत्सव (तिथीप्रमाणे), रंगपंचमी, गुढीपाडवा, रमजान ईद आणि रामनवमी या सणांच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या सूचनेनुसार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


या बैठकीत प्रामुख्याने धार्मिक सलोखा राखण्यावर भर देण्यात आला. छोट्या कारणांवरून होणारे वाद किंवा मुलांमधील वादाला जाती-धर्माचे स्वरूप देऊन मोठे वाद निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा घटनांबाबत नागरिकांनी जागरूक राहून तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी आणि आपापसात तडजोड करून वाद मिटवावेत, तसेच बार्शी शहरातील प्रत्येक प्रभागात 'मोहल्ला समिती'चे सदस्य निवडून त्यांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरील किरकोळ वाद समन्वयाने मिटविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि प्रचलित कायद्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. केवळ अधिकृत धार्मिक स्थळांनाच पोलीस प्रशासनाच्या परवानगीने स्पीकर बॉक्स बसवण्याचा परवाना दिला जाईल. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आयोजकांनी ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे; अन्यथा संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या बैठकीस शहरातील विविध जाती-धर्माचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)