OTP scammer located in Delhi was detained by Barshi police
बार्शी विशेष : क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याच्या बहाण्याने ओटीपी विचारुन खात्यावरुन १ लाख ९८ हजार रुपये काढून घेणाऱ्या आरोपीस बार्शी शहर पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांच्या भाषेत बोलायचे तर 'स्कॅमर पुलिस के हत्थे चढ गया' नरेश महेशचंद शर्मा (वय ४५) रा. बगीची रघुनाथ, उत्तर दिल्ली असे स्कॅमरचे नाव आहे.
फिर्यादी महादेव विठ्ठल मिरगणे (वय ५३) रा. म्हाडा कॉलनी, गाडेगांव रोड, बार्शी यांना १३ फेब्रुवारी २०२२ रोजी क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून कार्ड ब्लॉक करण्यासाठी ओटीपी विचारुन त्यांच्या क्रेडिट कार्ड खात्यावरुन १ लाख ९८ हजार २०८ रुपये रक्कम काढून घेण्यात आली होती. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
सन २०२२ मधील गुन्ह्यांचा आढावा घेत असता पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना , सदर गुन्हा प्रलंबित असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांनी याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केलेल्या तपासात गुन्ह्यातील आरोपी दिल्ली येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानुसार, पोलिस उपनिरिक्षक महेश गळगटे व त्यांचे पथकाने दिल्ली येथे जाऊन गुन्ह्यातील आरोपी सदर बझार, उत्तर दिल्ली परिसरात राहात असल्याची खात्री केली.
त्यानंतर बार्शीचे पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे यांनी उपनिरिक्षक अभय माकणे, पोकॉ दिगंबर बरबडे, सचिन नितनात, अवि पवार यांचे पथक दिल्ली येथे पाठवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आरोपीस बार्शी येथे आणले. बार्शीत आल्यावर आरोपीने फिर्यादीस संपूर्ण रक्कम परत केली.
