Confusion over BSNL SIM card charges; 100 is charged for SIM replacement instead of 60
बार्शी विशेष : बीएसएनएल मध्ये मोबाईल क्रमांक पोर्ट करायचा असो किंवा सिमकार्ड बदलून घ्यायचे असो, त्यासाठी बार्शीतील बीएसएनएल कार्यालयाकडून ग्राहकांना सिमकार्डसाठी चाळीस रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाते, पण शहरातील बीएसएनएलच्या अधिकृत फ्रँचायझीकडून मात्र यासाठी शुल्क आकारले जात नाही. ही बाब ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर बीएसएनएल कार्यालयात चाळीस रुपये अधिक गेल्याची भावना ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे.
बहुतांशी ग्राहकांना फ्रँचायझीमधून या सेवा घेतल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही याची कल्पना नसल्यामुळे, चाळीस रुपयांचा भुर्दंड विनाकारणच सहन करावा लागत आहे. तसेच सिमकार्ड बदलून घेण्यासाठी किती शुल्क लागते याबाबत बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राकडे चौकशी केल्यास यासाठी केवळ साठ रुपये शुल्क असल्याचे सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात येथील कार्यालयाकडून शुल्क साठ रुपये अधिक सिमकार्डसाठी चाळीस असे शंभर रुपये ग्राहकांकडून घेतले जात आहेत.
'बार्शी विशेष' ने हा मुद्दा बीएसएनएलकडे उपस्थित केला. त्यानंतर बार्शी बीएसएनएल कार्यालयात शुल्कातील तफावतीबाबत एक सूचना छोट्या कागदावर प्रिंट करुन लावली आहे. सेवा घेण्यापूर्वी शुल्क आकारणीबाबत ग्राहकांना या सूचनेद्वारे माहिती मिळणार असली तरीही, ही सूचना मोठ्या आकारात प्रवेशद्वारावर दर्शनी भागात लावल्यास ती अधिक उपयुक्त होईल अशी अपेक्षा ग्राहकांतून व्यक्त होत आहे.
माहिती अभावी ग्राहकांचे नुकसान होते हा मुद्दा बरोबर आहे, सिमकार्ड शुल्क आकारणीमधील तफावतीबाबत ग्राहकांना पूर्वकल्पना येण्यासाठी कार्यालयात सूचना प्रदर्शित केली आहे. सिमकार्ड बदलून देण्यासाठी शंभर रुपये घेतले जातात, त्याबाबत सोलापूर कार्यालयाकडून माहिती मागविली आहे, ती प्राप्त झाल्यावर असा बदल झालेला असेल त्या तारखेपासून ग्राहकांकडून सिमकार्डसाठी घेतलेले चाळीस रुपये शुल्क परत केले जाईल.
-संतोष कोकणे, उपविभागीय अभियंता, बीएसएनएल, बार्शी
