While investigating a two-wheeler theft, Barshi police caught the tractor thief
बार्शी विशेष : दुचाकी चोरीचा तपास करत असताना, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून ट्रॅक्टर व दुचाकी चोरणारे दोघेजण बार्शी शहर पोलिसांच्या हाती लागले. त्यांचेकडून एकूण ६ कुबोटा ट्रॅक्टर, एक ब्लोअर व एक दुचाकी मिळून ३२ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शहरातील नाईकवाडी प्लॉट, उपळाई रस्ता येथून चोरीस गेलेल्या दुचाकीच्या गुन्ह्याचा तपास करणारे हवालदार प्रविण साठे व त्यांच्या पथकास रात्रगस्त घालत असताना, १६ ऑक्टोबरच्या रात्री अकराचे सुमारास गाडेगांव चौक येथे एक इसम ट्रॅक्टरसह संशयास्पदरीत्या उभा असलेला दिसून आला. त्याचेकडे विचारपूस केली असता, त्याने सदर ट्रॅक्टर माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथून मित्राच्या मदतीने चोरल्याचे कबुल केले.
ताब्यात घेतलेल्या वैभव ज्ञानेश्वर फुंड (वय २९) रा. सावरगांव काटी, ता. तुळजापूर याने त्याचा मित्र संजय जगन्नाथ शिरगिरे याच्या मदतीने बार्शीच्या उपळाई रस्ता येथून एक दुचाकी, धामनगाव, राळेरास, मुंगशी (आर) ता. बार्शी आणि माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथून एकूण सहा ट्रॅक्टर व एक ब्लोअर चोरल्याची कबुली दिली. यासंदर्भात वैराग, सोलापूर तालुका व धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर, हवालदार अमोल माने, प्रविण साठे, बाळकृष्ण डबडे, पोकॉ अजीज शेख सचिन देशमुख, अंकुश जाधव, राहुल उदार, पवार, बहिरे, उघडे, भांगे, जाधवर, मस्के यांनी केली. पुढील तपास हवालदार प्रविण साठे करत आहेत.
