Financial fraud with the lure of higher returns
बार्शी विशेष : ट्रेडींग कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळतो असे सांगून पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करुन आर्थिक फसवणूक केली, अशी फिर्याद रुक्साना इम्रान डिग्रजे (वय ३६), रा. वाणी प्लॉट, बार्शी यांनी दिल्यावरुन बार्शी शहर पोलिसांनी १) सुनिल नवनाथ वायचळ, २) गणेश नवनाथ वायचळ, ३) सुयोग गणेश वायचळ व ४) सौरभ गणेश वायचळ (सर्व रा. वाणी प्लॉट, बार्शी) यांचेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
फिर्यादी नर्स म्हणून सुश्रुत हॉस्पीटल येथे कार्यरत आहेत. काही दिवसापूर्वी हिरेमठ हॉस्पीटलमध्ये सेवेत असताना त्यांचे वरील सर्वांशी विश्वासाचे संबंध निर्माण झाले होते. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सुनिल वायचळ यांची भेट झाल्यानंतर त्यांनी तुमच्या फायद्याचे काम आहे असे सांगून घरी बोलावले. त्यांचे भाऊ गणेश वायचळ यांचे घरी फिर्यादी गेले तेव्हा वरील सर्वजण उपस्थित होते. त्यांनी आयएफ ग्लोबल या ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास १० टक्के परतावा मिळतो, आत्तापर्यंत कित्येक जणांना फायदा करुन दिला आहे अशी माहिती सांगून गुंतवणूकीस प्रवृत्त केले.
फिर्यादीने भगवंत सहकारी बँकेतून पाच लाख रुपयांचे कर्ज काढले. सुनिल वायचळ यांनी वेळोवेळी एकूण ४ लाख ८० हजार रुपये खात्यात वर्ग केले. डीमॅट खाते काढले नाही म्हणून फिर्यादीने विचारणा केल्यावर पैशाची जबाबदारी मी घेत आहे, काळजी करु नको असे सांगितले.
पुढे काही दिवसांत फिर्यादीला वेळोवेळी थोडी थोडी रक्कम मिळून दीड लाख रुपये परतावा मिळाला. नंतर रक्कम मिळणे बंद झाल्यामुळे पैशांची मागणी केल्यावर टाळाटाळ केली आणि यापुढे पैसे मागू नको आणि पोलिसांकडे गेल्यास पैसे मिळणार नाहीत असे सांगून पैसे देण्यास नकार दिला.
