बार्शी विशेष : बार्शीच्या बीएसएनएल कार्यालयातून सिमकार्डसाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याबाबतचे वृत्त 'बार्शी विशेष' मधून प्रसिध्द होताच, जादा आकारण्यात आलेले चाळीस रुपये शुल्क बीएसएनएल कडून ग्राहकांना आता परत देण्यात येत आहे.
मोबाईल क्रमांक पोर्ट करणे, सिमकार्ड बदलून देणे इत्यादी सेवांसाठी बार्शीतील बीएसएनएल कार्यालयात ग्राहकांकडून सिमकार्डसाठी चाळीस रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जात होते. सिमकार्ड बदलण्याचे शुल्क साठ रुपये असताना शंभर रुपये घेतले जात होते.
याच सेवांसाठी शहरातील बीएसएनएलच्या अधिकृत फ्रँचायझीकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात नसले तरीही, त्याबाबतची माहिती सर्वच ग्राहकांना नसल्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत होते.
'बार्शी विशेष' ने याबाबत वृत्त प्रसिध्द करताच, शहरातील अधिकृत फ्रँचायझी व बीएसएनएल कार्यालयातून आकारल्या जाणाऱ्या शुल्कातील तफावतीबाबतची सूचना ग्राहकांच्या माहितीसाठी बीएसएनएल कार्यालयात लावण्यात आली. तसेच अतिरिक्त आकारण्यात आलेले चाळीस रुपये शुल्क परत घेऊन जाण्यासाठी संबंधित ग्राहकांना संपर्क करुन सांगण्यात आले असल्याची माहिती बीएसएनएल उपविभागीय अभियंता संतोष कोकणे यांनी दिली.
'बार्शी विशेष' मधील वृत्तामुळे अतिरिक्त शुल्क परत मिळाल्याबद्दल ग्राहकांतून समाधान व्यक्त होत असून, सोबतच बीएसएनएल कडून नियमित दर्जेदार, समाधानकारक सेवा मिळावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

