Balak Mandir distributes Diwali materials to flood victims
बार्शी विशेष : काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार वाहून गेले, घरे उद्ध्वस्त झाली, हसरे चेहरे दुःखी झाले. अशाच काही पूरग्रस्तांच्या जीवनात दिवाळीचा आनंद भरण्याचा प्रयत्न सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली गोरे यांच्या संकल्पनेने करण्यात आला.
या उपक्रमांर्तगत सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर व पालक यांच्या संयुक्त विद्यमाने, तालुक्यातील मांडेगाव येथील पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळीसाठी गरा, मैदा, साखर, तेल, तांदूळ, गहू, दाळी, चुरमुरे, साबण, साडी, टॉवेल, आकाश दिवे तसेच अंगणवाडीतील लहान मुलां-मुलींना पोशाख व शालेय साहित्य देण्यात आले. या कृतीतून प्रशालेने ज्ञानदानासोबतच सामाजिक बांधिलकी जपल्याचे दाखवून दिले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. दिपाली गोरे, पालक प्रतिनिधी अभिषेक पंपट तसेच मांडेगावचे उपसरपंच सतीश मिरगणे, ग्रामसेवक इंगळे, पोलीस पाटील राहुल बंडू, रोजगार सेवक उमेश मिरगणे, ग्रामपंचायत सदस्य बबन मिरगणे, सुरेश पायघन, जीवन दळवी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन दळवी यांनी केले.
या उपक्रमासाठी बालक मंदिरच्या दिपाली कळसकर, पूनम वासकर, भारती चोपडे, तेजश्री स्वामी, लखन जाधव, मंगळवेढेकर आदींनी परिश्रम घेतले.