बार्शीत भरदिवसा झालेल्या घरफोडीचा तीन तासात छडा; मुद्देमालांसह आरोपीस अटक

Admin
0

 

House burglary during daytime solved within three hours; suspect arrested with recovered items
House burglary during daytime solved within three hours; suspect arrested with recovered items


बार्शी विशेष: भरदिवसा घर फोडून ३ लाख ३५ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस शहर पोलिसांनी तीन तासात मुद्देमालांसह अटक केली. नागेश राजू बगाडे (वय ३२), रा. झाडबुके मैदानामागे, पाण्याच्या टाकीजवळ, बार्शी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भगवंत देवस्थानचे विश्वस्त विलास दत्तात्रय सुरवसे हे भगवंत मंदिरात असताना, त्यांच्या बुरुड गल्ली येथील निवासस्थानी कोणीही नसल्याचा फायदा घेत, घरातील तिजोरी फोडून ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासहाचे सुमारास घडली होती.

याबाबतची फिर्याद दाखल होताच, पोनि बालाजी कुकडे यांनी तपासाची जबाबदारी हवालदार साठे यांच्याकडे देऊन, गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी नागेश बगाडे याला चोरीच्या संपूर्ण मुद्देमालासह रिंग रोड, बार्शी येथून ३ तासात ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे, हवालदार माने, डबडे, साठे, पोकॉ फत्तेपुरे, जाधव, पवार, उदार, देशमुख, नितनात, बहिरे, शेख, उघडे यांनी केली. 

नागरिकांनी घरातून बाहेर पडताना दारे-खिडक्या सुरक्षित ठेवाव्यात आणि संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


आधुनिक तंत्रज्ञान आणि पोलिस पथकाच्या समर्पित प्रयत्नांमुळे आम्ही गुन्हेगारांना त्वरित पकडण्यात यशस्वी ठरलो. यामुळे बार्शी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा विश्वास दृढ होईल.
-अतुल कुलकर्णी , पोलिस अधीक्षक


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)