The use of laser lights in the procession; Barshi police have filed a complaint
बार्शी विशेष : सोलापूर जिल्ह्यात सार्वत्रिक मिरवणूकीत डॉल्बी सिस्टीम आणि लेजर लाईट वापर करण्याचा मनाई आदेश जारी असतानाही, मिरवणूकीत लेजर लाईटचा वापर केल्याचे आढळल्याने बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्र उत्सवानिमित्त गुंड प्लॉट,परांडा रस्ता ते तुकाई देवी या मार्गावरुन देवीला हार घेऊन जाण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी असलेल्या राजकमल बँडच्या वाहनावर लेजर लाईटचा वापर केल्याचे तेथून जात असलेल्या पोलिस गस्ती पथकास दिसून आले, त्यामुळे सहाय्यक पोलिस फौजदार अजित वरपे यांनी दोन पंचासमक्ष ते ताब्यात घेतले.
राजकमल बँड यांनी ध्वनीक्षेपकाची परवानगी मिळण्यासाठी केलेल्या अर्जावर पोलिसांनी त्यांना मिरवणूकीमध्ये पारंपारिक वाद्य वाजविण्याची परवानगी दिलेली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालवधीत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर करता येणार नसल्याचे दिलेल्या परवानगीत स्पष्ट केले होते असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोकॉ कादर तांबोळी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन, मनोज अंबऋषी शिंगनाथ, रा. गुंड प्लॉट, परांडा रोड, बार्शी यांचेविरुध्द भा.न्या.सं. २०२३ चे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.