बार्शी विशेष : बार्शी-लातूर रस्त्यावर घडलेल्या अपहरण प्रकरणी, शहर पोलिसांनी एक महिलेसह सहा जणांना अटक केली. मिरा नंदकुमार धुळगुंडे, नंदकुमार गणपती धुळगुंडे, यशवंत नंदकुमार धुळगुंडे (तिघेही रा. सादलापुर ता पालम, परभणी), बालाजी खंडुराव सुर्यवंशी (रा. साखळा प्लॉट, परभणी), गोविंद माधवराव सायंगुडे, रा. संतकबीर नगर, वांगी रोड, परभणी) व बालाजी अशोक शिंदे, (रा. प्रसावत नगर, परभणी) अशी त्यांची नावे आहेत.
बार्शी-लातूर रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळून संतोषसिंग देविसिंग चंदेले (वय ३४) रा. उमानिवास, हिंगोली नाका, हुलासिंग गोविंद नगर, नांदेड यांचे कारची चावी काढून घेत अपहरण केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली होती. याबाबत त्यांची सासू शारदा राजेंद्रसिंह चंदेले, (वय ५३) रा. लक्ष्मी नगर, बार्शी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली होती.
अपहृत व्यक्तीशी संपर्क होत नसल्यामुळे, पोलिसांनी त्यांचे वडिल व पत्नी यांचेकडून माहिती घेऊन तांत्रीक विश्लेषण केले असता, त्यांना नांदेडच्या दिशेने नेले जात असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून सदर गुन्ह्यात वापरलेल्या इर्टिगा (क्र. एमएच-२२-एडब्ल्यू-८४८८) कारसह सहा अपहरणकर्त्यांना पालम पोलीस ठाणे, जि. परभणी येथून ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन बार्शी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उप विभागिय पोलीस अधिकारी अशोक सायकर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोऊनि उमाकांत कुंजीर, हवालदार अमोल माने, पोकॉ जाधव, नितनात, फत्तेपुरे, रतन जाधव यांनी केली. पुढील तपास सपोनि बाळासाहेब जाधव करत आहेत.