An elderly man was injured when a shed collapsed due to rain in Barshi
बार्शी विशेष : मंगळवार दि. २० मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे सायं. ५ चे सुमारास बार्शी तहसिल कार्यालयासमोर असलेल्या डमरे यांच्या कॅन्टीन वरील पत्र्याचे छत कोसळून त्याखाली काही नागरिक अडकले.
या घटनेची माहिती समजताच तहसिलदार एफ. आर. शेख यांनी आपत्ती कक्षातील कर्मचाऱ्यांसह धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरु केले. पत्र्यांखाली अडकलेले विठ्ठल यल्लाप्पा गुंजाळ (वय ६५) रा. बार्शी, मालन हरिश्चन्द्र ताकभाते (वय ६५) रा. श्रीपतपिंपरी, विजाबाई विठ्ठल गुंजाळ (वय ६०) रा. बार्शी, रेणुका दत्तात्रेय ताकभाते (वय ४०) रा. श्रीपतपिंपरी, दत्तात्रेय हरिश्चन्द्र ताकभाते (रा. श्रीपतपिंपरी) या पाच नागरीकांना सुखरुप बाहेर काढले. तर जखमी झालेले अर्जुन नागनाथ गवसाणे (वय ७६) रा. सौंदरे यांना जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
नायब तहसिलदार सुभाष बदे, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संदीप नालपे, आरोग्य विभाग, शहर पोलीस व नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य पार पाडले.
या घटनेनंतर तहसिलदार शेख यांनी, शहरातील धोकादायक ठिकाणे शोधून तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना बार्शी नगरपरिषदेस दिल्या आहेत.