Organizing a procession in Barshi city for Ramnavami
पोलिस यंत्रणा सतर्क : ड्रोनद्वारे टेहळणीसह तगडा बंदोबस्त तैनात
बार्शी विशेष : रविवार दि. ६ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा होत असून, त्याची तयारी सर्वत्र उत्साहात व जोमाने सुरु आहे. श्रीराम नवमी उत्सव समिती, बार्शी यांचेकडून सालाबादप्रमाणे श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री बापूसाहेब कदम यांनी दिली. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघणाऱ्या या शोभायात्रेतील नऊ फूट उंचीची श्रीरामाची मूर्ती आणि सात फूट उंचीची श्री हनुमानाची मूर्ती हे प्रमुख आकर्षण असणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनही सतर्क झाले असून, सात अधिकारी, राज्य राखीव दलाच्या तुकडीसह शंभर पोलिस अंमलदार तसेच दंगा काबू पथक असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती बार्शी शहर पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे यांनी दिली. रामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रा उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी तसेच धार्मिक व जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कुकडे यांनी केले आहे.