Barshi city police success in murdering a woman
बार्शी विशेष : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अलिपूर रस्त्यावरील ज्वारीच्या शेतात आढळून आलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले असून त्या महिलेचा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. अर्चना विनोद शिंदे (वय ३२) रा. घाटंग्री, ता. जि. धाराशिव असे मयत महिलेचे नाव असून, तिचा खून केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांनी नितीन प्रभू जाधव रा. घाटंग्री, ता. जि. धाराशिव यास अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, २६ जानेवारी रोजी अलिपूर रस्त्यावरील ज्वारीच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. अकस्मात मृत्यू म्हणून बार्शी शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असली तरी, तो खून असल्याची शंका पोलिसांना होती. त्यादृष्टीने तपास करत असताना, सदर महिला अलिपूर रोड येथे भाड्याने राहत होती व एक पुरुष तिला भेटण्यासाठी नेहमी येत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.
अधिक तपासात मयत महिलेचे नाव अर्चना विनोद शिंदे रा. घाटंग्री, ता. जि. धाराशिव असून, ती १८ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची नोंद धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणे येथे झाली असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासातून नितीन प्रभू जाधव रा. घाटंग्री, धाराशिव याचे नाव पुढे येताच, बार्शी शहर पोलिसांनी त्याला घाटंग्री येथून ताब्यात घेतले.
शेतकऱ्यांना मजूरीसाठी कामगार पुरविण्याचे काम करणाऱ्या नितीन जाधव याचे, त्याच्या वाहनातून मजूर ने-आण करताना मयत महिलेशी ओळख होऊन अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. त्यासाठी त्याने बार्शीतील अलिपूर रोडवर एक खोली तिला भाड्याने करुन दिली होती व तो सतत तिला भेटायला येत होता. अलिकडेच त्या महिलेने, तू मला तुझ्या घरी घेऊन चल नाहीतर तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून मरणार अशी धमकी देण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांच्यात वाद सुरु झाले होते. १० जानेवारी रोजी सायंकाळी चारचे सुमारास नितीन याने गोड बोलून तिला अलिपूर रोडवरील ज्वारीच्या शेतात नेले आणि स्कार्फने गळा आवळून तिचा खून केला तसेच तिच्याकडील मोबाईल फोडून टाकून देऊन तो गावाकडे निघून गेला.
याप्रकरणी सपोनि बाळासाहेब जाधव यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सपोनि प्रदिप झालटे करत आहेत.
सदर हत्येचा उलगडा करण्याची कामगिरी पो.अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पो.अधिक्षक प्रीतम यावलकर, उप विभागीय पो.अधिकारी जालंदर नालकुल, पोनि बालाजी कुकडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बाळासाहेब जाधव, पोना दत्तात्रय आडसूळ, पोशि इसमियाँ बहिरे, धनराज फत्तेपुरे, अविनाश पवार, राहुल उदार ब्रम्हदेव वाघमारे, सायबरचे रतन जाधव यांनी पार पाडली.