Drugs and a pistol were found in a peaceful barshi
बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत अंमली पदार्थ व गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. बुधवारी १७ एप्रिलच्या रात्री ११ चे सुमारास परांडा रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. असद हसन देहलुज (वय ३७) रा. पल्ला गल्ली, परांडा, जि. धाराशिव, मेहफुज महंमद शेख (वय १९) रा. बावची, ता. परांडा, जि. धाराशिव व सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख (वय ३२) रा. कसबापेठ, काझी गल्ली, बार्शी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बुधवार १७ एप्रिल रोजी रात्री ११.२० चे सुमारास परांडा रस्ता येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेल स्वराज समोरील रस्त्यालगत सदर तिघेजण मॅफेड्रॉन (एम.डी.) नामक अंमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, तीन जिवंत राउंडसह एक गावठी पिस्तुल, टोयोटा कार, तीन मोबाईल आणि रोख रक्कम याप्रमाणे एकूण १३ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जवळ बाळगलेल्या स्थितीत आढळून आले. शहर पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करुन तिघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिस ऊपनिरिक्षक उमाकांत कुंजीर यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सदर आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. (अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ) कायदा कलम ८ (क), २२ (ब), २९, भारतीय शस्त्र कायदा १९५९ कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे, तसेच सोलापूर जिल्ह्यात जारी असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबतही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक माकणे करत आहेत. सदर आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तुळजापूर शहराला अंमली पदार्थाने घातलेल्या विळख्याचे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत असताना, 'शांत' असलेल्या 'निवांत' बार्शीत अंमली पदार्थ आणि पिस्तुल सापडल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.