Armed robbery at DCC Bank; Rs 1.5 lakh cash stolen
बार्शी विशेष : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तीन इसमांनी सशस्त्र दरोडा टाकून दीड लाखाची रोकड लूटून नेली. बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील बँकेच्या शाखेत ही घटना ७ मार्च रोजी दुपारी सव्वाचारचे सुमारास घडली. शाखाधिकारी तथा रोखपाल सोमनाथ भगवान कोरे (वय ५०) रा. आझाद चौक, बार्शी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, सपोनि दिलीप ढेरे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून तिघांना अटक केली आहे.
याबाबत हकिगत अशी की, शुक्रवार दि. ७ मार्च रोजी बँकेतील रोख रक्कम मोजून ठेवत असताना दुपारी सव्वाचारचे सुमारास, काळे-निळे जर्किन व माकडटोपी घातलेले २० ते २५ वयोगटातील तीन इसम बँकेत आले आणि जेवढे पैसे आहेत ते दे आम्ही रॉबरी टाकायला आलो आहोत असे म्हणत पैसे मागू लागले. ही चेष्टा असेल असे समजून शाखाधिकारी कोरेंनी त्यांना बाहेर व्हा म्हणताच, एकाने कोयता काढून नोटांचे बंडल घेण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार केला असता, त्याने कोयत्याचा वार केला, कोरेंनी हात आडवा धरल्यामुळे हाताला जखम होऊन ते खाली पडले.
त्याचवेळी एकाने कोयता व जाड इसमाने पिस्तुल काढून बँक कर्मचाऱ्याकडे रोखून कोणीही उठायचे नाही असा दम दिला. कोरे पैसे देत नाहीत असे दिसताच पिस्तुल घेतलेल्या इसमाने वरच्या दिशेने दोनवेळा फायर केले. त्यामुळे सगळेजण घाबरुन शांत बसताच कोयता मारलेल्या इसमाने कोरे यांचे समोर असलेली १ लाख ५४ हजार ३०० रुपये रोख रक्कम उचलून जर्किनमध्ये भरली, आणि कालवा केला तर सगळ्यांना खल्लास करेन अशी धमकी देत ते बँकेच्या बाहेर लावलेल्या काळ्या रंगाच्या व क्रमांक नसलेल्या एचएफ डिलक्स मोटरसायकलवरुन रस्तापूर गावाच्या दिशेने पळून गेले.
उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल व सपोनि दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अभय उंदरे, पोकॉ सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड, सागर शेंडगे व सहकाऱ्यांनी तातडीने दरोडेखोरांचा माग काढून कोरफळे शिवारातून अटक केली.
