बार्शी विशेष : बार्शी तालुका पोलिसांनी बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावरील शेंद्री फाट्यानजिक विनापरवाना, बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. अरबाज जिलाली जमादार (वय २१) रा. संजयनगर, वैराग, ता. बार्शी असे त्याचे नाव असून, १० डिसेंबरच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
बार्शी तालुका पोलिस ठाणे प्रभारी सपोनि दिलीप ढेरे यांना शेंद्री फाटा परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून पहाटे दोनचे सुमारास मिळाली. सपोनि ढेरे यांनी तत्काळ पोलिस पथकासह बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावरील शेंद्री परिसरात जाऊन तपासणी सुरु केली. त्यावेळी हॉटेल महाराजा समोर एक इसम मोटरसायकल (क्र. एमएच१३-ईआर-७१२९) सह संशयास्पदरित्या थांबलेला दिसून आला.
त्याचेकडे विचारपूस केल्यानंतर पोलिसांना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या अंगझडतीमध्ये पोलिसांना एक काळ्या विटकरी रंगाचे, बॅरेलवर मेड इन यूएसए नं. ७० लिहलेले पिस्टल, एक मॅगजिन त्यामध्ये एक केएफ ७.०५ लिहलेले जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी त्यांला पिस्टल, काडतूस व मोटरसायकलसह ताब्यात घेतले.
पोकॉ राहुल बोंदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, त्याचेविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात विनापरवाना, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याबद्दल शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
सदर आरोपीस अटक करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रेवती बगाडे यांचेसमोर हजर केले असता, त्यास १२ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासात आंतरराज्यीय टोळी निष्पन्न होण्याची शक्यता असल्यामुळे त्या अनुषंगाने पोलिस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई सपोनि दिलीप ढेरे यांचेसह हवालदार केकाण, पोकॉ राहुल बोंदर, सुरेश बिरकले, युवराज गायकवाड यांनी केली.
