Two accused of murder in the custody of Barshi Taluka police
बार्शी विशेष : तालुक्यातील बाभुळगाव येथे सोन्याची चेन आणि पैशासाठी खून करुन मृतदेह शेतात पुरणाऱ्या दोन आरोपींना बार्शी तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दिलीप निवृत्ती झोंबाडे (रा. बाभुळगाव) व राहुल नागेश गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, २० फेब्रुवारी रोजी सुरेश रंगनाथ शिंदे (वय ६८) रा. बाभुळगाव, ता. बार्शी यांचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत नितीन रमेश शिंदे रा. बाभुळगाव यांच्या शेतात आढळून आला होता. त्यासंदर्भात बार्शी तालुका पोलिसांनी भान्यासं कलम १०३(१) व २३८ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक तपास करताना मयताचे शेजारी वावरणारे दिलीप निवृत्ती झोंबाडे व बाभुळगावात सालगडी म्हणून काम करणारा राहुल नागेश गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) यांनी सदर गुन्हा केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. मयताच्या गळ्यातील सोन्याची चेन व जवळ असलेल्या पैशांसाठी कट रचून, गळा आवळून, खून करुन त्यांचा मृतदेह नितीन शिंदे यांचे शेतात पुरल्याची दोघांनी कबुली दिली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. सरकारी अभियोक्ता सोनवणे यांनी बाजू मांडली. सदर गुन्ह्यात आणखीन आरोपींचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
सदर कामगिरी पो. अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पो. अधिक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पो. अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि दिलीप ढेर, उपनिरिक्षक बालाजी वळसणे, हवालदार राजेंद्र मंगळुरे, अभय उंदरे, धनराज केकाण, पोना सागर शेंडगे, पोशि राहुल बोंदर, सिध्देश्वर लोंढे, युवराज गायकवाड तसेच बार्शी शहर पोलिस ठाणेकडील उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोउनि अजित वरपे, पोशि धनराज फत्तेपुरे व सायबरचे रतन जाधव यांनी केली.