Police administration ready for Barshi Municipal Council elections
बार्शी विशेष : २ डिसेंबर २०२५ रोजी बार्शी नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी मतदान होत असून, मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळितपणे पार पाडण्यासाठी पोलिस प्रसाशन सज्ज झाले आहे. यासाठी १ उपविभागीय पोलिस अधिकारी, २ पोलिस निरिक्षक, ७ सपोनि/उपनिरिक्षक, १५९ अंमलदार, १५२ होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या २१ प्रभागासाठी ४३ इमारत/केंद्रातील ११२ बूथमध्ये होणार असलेल्या मतदानासाठी पोलिसांकडून ५ विभागात पेट्रोलिंग केले जाणार असून त्यांच्यासोबत व्हिडिओग्राफर असणार आहे. त्याचप्रमाणे संवेदनशील मतदान केंद्रावर अधिक बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे यांनी दिली.
मतदान केंद्रात मतदारांना मोबाईल नेण्यास बंदी असून, मतदान केंद्रात व परिसरात मोबाईलद्वारे चित्रीकरण करुन समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
