The finance office vandalized in fear of Koyta
बार्शी विशेष : शहरातील मायक्रो फायनान्समध्ये दोन अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून धमकी देत कार्यालयातील साहित्याचे नुकसान केले. ही घटना २ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनचे सुमारास घडली. शाखाधिकारी आदम अस्लम शेख (वय २२) रा. गुंड प्लॉट, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिसांनी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परांडा रस्ता वैदूवस्ती येथील ग्रामीण कुटा मायक्रो फायनान्सच्या कार्यालयात शाखाधिकारी आदम शेख केबिनमध्ये बसलेले असताना व कर्मचारी काम करत असताना दुपारी साडेतीनचे सुमारास संपूर्ण काळे कपडे घालून, मास्कने चेहरा झाकून हातात लोखंडी कोयते घेतलेल्या २५ ते ३० वयोगटातील दोन अनोळखी इसमांनी कार्यालयात प्रवेश केला. विकास नामवाडे यांच्या टेबलवर जोरात कोयता मारत कपाटातील सगळी रक्कम देण्यास सांगितले. त्यांनी चावी माझ्याकडे नाही शाखाधिकारी आणि कॅशिअरकडे असल्याचे सांगताच, त्याच्यावर कोयता टाक आणि हाण त्याला त्याशिवाय तो खरे बोलणार नाही असे दुसऱ्या जोडीदाराने मराठीत बोलून कोयत्याने टेबलवर, भिंतीवर, लॉकरवर, खुर्च्यावर वार केले आणि कोयत्याने मारुन सीसीटीव्ही कॅमेरा तोडला.
नंतर शेख यांच्या केबिनमध्ये जाऊन टेबलवर कोयता आपटत मानेजवळ कोयता धरुन कपाटातील पैश्यांची मागणी केली. त्यावर रक्कम बॅंकेत भरली आहे, बाहेर साहेबांना विचारा म्हणून सांगितल्यावर पुन्हा बाहेर जाऊन विलास नामवाडे यांना धमकी देत टेबलवर कोयता आपटू लागले. त्याचवेळी फायनान्सबाहेर लोक जमा होऊ लागल्याचे दिसताच, बाहेर लावलेल्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर बसून ते दोघे उपळाई रस्त्याकडे पळून गेले.