Anti-Corruption Committee's self-hypnosis camp for Barshi police
बार्शी विशेष : दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या मानसिक ताण तणावाशी पोलिसांना नेहमीच सामना करावा लागतो. हा मानसिक ताण कमी करण्यासाठी मन एकाग्र करुन स्वयंसूचना कशा घ्याव्यात आणि मानसिक ताण कसा कमी करावा याविषयीचे प्रशिक्षण देण्यासाठी सोलापूर येथील संमोहन तज्ञ रविंद्र सोरटे यांच्या स्वसंमोहन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
बार्शी शहर पोलिस ठाणे येथे आयोजित केलेल्या शिबीरामध्ये सोरटे यांनी स्वयंसूचना घेऊन तणाव कमी करण्याचे तंत्र प्रात्यक्षिकासह शिकविले. या शिबीरात उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, बार्शी शहर पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे, तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप ढेरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. भ्रष्टाचार निर्मूलन समितीने 'जनसंवाद' च्या माध्यमातून दिलेले हे प्रशिक्षण तणावमुक्तीसाठी उपयुक्त व फायदेशीर ठरेल असे मत सहभागी शिबीरार्थींनी व्यक्त केले.
याप्रसंगी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय कोरे, समितीचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी प्रा. अनिल मुंढे, बार्शी तालुका उपाध्यक्षा संगीता पवार आदी उपस्थित होते.