बार्शीत अवैधरित्या राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक

Admin
0

 

Six Bangladeshi nationals living illegally in Barshi arrested
Six Bangladeshi nationals living illegally in Barshi arrested


बार्शी विशेष : बार्शीतील पंकजनगर येथे अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या चार महिला व दोन पुरुष अश्या सहा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नजमा याशिन शेख उर्फ बिठी बेगम यासीन शेख (वय ३३ रा. पेरोली, थाना कालिया, जि. नोडाईल) , रेहना बेगम समद शिकंदर उर्फ साथी रूबेल खान (वय ३३, रा. लष्करपुर, थाना तिरूखदा, जि. खुलना), आरजिना खातून अन्वर शेख (वय १९, रा. परहाजिगिरम, थाना तेरोखदा, जि. खुलना), शिखा शाकीब दुहीया (वय २२, रा. पार बिशऊपूर, थाना कालिया, जि. नोडाइल), शाकीय बादशाह बुहीया (वय २३, रा. लष्करपुर, थाना तिरुखदा, जि. खुलना), व शोएब उर्फ शोएब सलम शेख (वय २४ रा. पेरोली, थाना कालिया, जि. नोडाइल) सर्व रा. बांगलादेश (सध्या पंकजनगर, बार्शी) अशी त्यांची नावे आहेत. सदरची कारवाई १६ जानेवारी रोजी दुपारी तीनचे सुमारास करण्यात आली.


बार्शीतील पंकजनगरमध्ये बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची बातमी दहशतवाद विरोधी पथक, सोलापूर युनिट तसेच दहशतवाद विरोधी शाखा, सोलापूर यांना मिळाली होती. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथक, सोलापूर युनिटचे पोनि सिध्दार्थ कदम, पोहेकॉ जावळे, पोकॉ जाधव, पोकॉ गडेकर तसेच दहशतवाद विरोधी शाखेचे पोनि डी. एस. बोरीगिड्डे, पोहेकॉ शेख व बार्शी शहर पोलीस ठाणे येथील पोउनि कुंजीर, मसपोफौ देशमुख, पोना सुरवसे, पोकॉ पवार, उदार, देशमुख, बरबडे, वाडकर यांनी बार्शीतील पंकजनगर येथील दोनमजली इमारतीमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या २ पुरुष व ४ महिलांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून १ लाख ४१ हजार ६०० रुपये रोख व ४६ हजार रूपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांचेकडे चौकशी केली असता वास्तव्य करण्यासाठी विशाल मांगडे, रा. मांगडे चाळ, राणी (पूर्ण नाव माहित नाही) रा. तेलगिरणी चौक, व किरण परांजपे रा. तेलगिरणी चौक, सर्व रा. बार्शी यांनी त्यांना मदत केल्याचे सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक सोनम ज्ञानेश्वर जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे नसताना व भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी नसताना घुसखोरीच्या अवैध मागनि भारतात प्रवेश करुन बार्शीतील पंकजनगर येथील दुमजली घरात अवैधरित्या वास्तव्य करताना आढळून आले तसेच वरीलपैकी दोघांनी भारतीय बनावट आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगले म्हणून भारतीय पारपत्र अधिनियम १९५० चे कलम ३(अ), ६ (अ) सह परकीय नागरीक आदेश १९४८ कलम ३(१), विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ सह भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (३), ३३८ प्रमाणे बार्शी शहर पोलिसांत त्यांचे विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, बार्शी शहर पोनि बालाजी कुकडे यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार दहशतवाद विरोधी पथक सोलापूर, दहशतवाद विरोधी शाखा, सोलापूर ग्रामीण व बार्शी शहर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)