'Sangayo' proposal for transgenders in Barshi; Waikule's efforts paid off
बार्शी विशेष : तृतीयपंथीयांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा लेखक सचिन वायकुळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेपासून आजवर वंचित राहिलेल्या बार्शी शहर व तालुक्यातील तृतीयपंथीयांसाठी प्रथमच संजय गांधी योजनेसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
बार्शीच्या तहसीलदारांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रशासकीयस्तरावर तृतीयपंथीयांना हा लाभ मिळण्याची प्रक्रिया आता सुलभ व गतीमान झाली आहे. शासनाने निराधारांना आधार मिळावा यासाठी संजय गांधी योजना तयार केली असली तरी, आजवर कागदपत्रे आणि प्रबोधनाअभावी बार्शी शहर व तालुक्यातील तृतीयपंथी समुदाय या संजय गांधी योजनेपासून वंचित होता. आता त्यांना या योजनेंतर्गत मासिक मानधन सुरु होऊन आधार मिळणार आहे.
तृतीयपंथीयांसाठी मागील आठ वर्षांपासून कार्य करणारे तथा या समुदायाचे मार्गदर्शक सचिन वायकुळे यांनी तृतीयपंथीयांचे प्रबोधन केले. त्यांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड आदी सुविधा उपलब्ध मिळवून दिल्या. त्यानंतर त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी वायकुळे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये तहसीलदार एफ.आर. शेख यांच्या उपस्थितीत तृतीयपंथीयांची बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदार शेख यांनी तृतीयपंथीयांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यास प्रशासकीयस्तरावर निश्चितपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.
या मागणीसाठी पुन्हा जानेवारी २०२५ मध्ये वायकुळेंनी तहसीलदार शेख यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे तृतीयपंथीयांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी पहिल्या टप्प्यात तृतीयपंथीयांचे १५ प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यासाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच संजय गांधी योजना विभागाची सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरली.