Sachin Waykule and Shamibha Patil felicitated for their work for underprivileged
बार्शी विशेष : वंचित आणि दुर्बल घटकांसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि शारदा वृद्धसेवाश्रम (सांगली आणि कोल्हापूर) यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण थोर समाजसुधारक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
बार्शीचे ख्यातनाम लेखक आणि पत्रकार सचिन वायकुळे सर तसेच जळगावच्या विधानसभेच्या तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.
सचिन वायकुळे सर यांनी मागील १५ वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी आणि ८ वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढा दिला आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी व्यवस्थेचे लक्ष या वंचित गटांच्या समस्यांकडे वेधले.
शमिभा पाटील, तृतीयपंथी हक्क व संरक्षण समितीच्या महाराष्ट्र समन्वयक, या साहित्य आणि सामाजिक कार्यक्षेत्रात चमकणारे नाव आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात उमेदवारी करणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी उमेदवार म्हणून त्यांनी नवा इतिहास घडवला.
हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर वंचित समाजासाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाचा आणि त्यांच्या हक्कांच्या लढ्याचा गौरव आहे.