Two beaten up for asking them not to drink here
बार्शी विशेष : येथे दारु पिऊ नका देवीचे मंदिर आहे असे सांगितल्यामुळे दोघा जणांना दगडाने मारहाण करुन जखमी केले. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊचे सुमारास घडली. किरण बजरंग शिंदे (वय २५) रा. बारंगुळे प्लॉट, बार्शी याने दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश गायकवाड रा. शिवशक्ती मैदानाजवळ, बार्शी व इतर तीन अनोळखी व्यक्तीविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेदिवशी फिर्यादी व त्याचा मित्र आकाश प्रभाकर शेळके उपळाई रस्ता येथील पाटलाच्या देवी मंदिरासमोर बोलत उभे असताना, मंदिरासमोरील वस्तीगृहाजवळ उभ्या असलेल्या टेंपोतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आल्यामुळे ते टेंपोकडे गेले. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा गणेश गायकवाड व इतर तीन अनोळखी इसम टेंपोमध्ये बिअर पिताना दिसले.
फिर्यादीने त्यांना येथे दारु पिऊ नका, देवीचे मंदिर आहे, महिलांची गर्दी जास्त आहे, दुसरीकडे जाऊन दारु प्या असे सांगितले असता, गणेश गायकवाड याने शिवीगाळी करत तुझा काय संबंध आम्हाला येथून हाकलण्याचा असे म्हणून दमदाटी करत असताना, त्याच्या सोबतच्या तीन अनोळखी इसमांनी टेंपोतून उतरुन तेथे पडलेले दगड उचलून फिर्यादी व त्याचे मित्राच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्यावेळी तेथे लोकांची गर्दी जमू लागल्यामुळे टेंपो घेऊन ते निघून गेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.