Three arrested for stealing at Barshi bus stand
बार्शी विशेष : गर्दीचा फायदा घेवून बार्शी बस स्थानकातून प्रवाशांचे पैसे चोरणाऱ्या तिघांना बार्शी शहर पोलिसांनी अटक केली. जमीर उर्फ शौकत जब्बार शेख (वय ३०) रा. तेलगांव चौक बीड, उसद जमीर शेख (वय १८) रा. बलभिम चौक, खंदक बीड, व हरून शब्बीर बागवान (वय २८) रा. शाहू नगर, बीड, अशी त्यांची नावे आहेत.
१७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ५ चे दरम्यान बार्शी सोलापूर बसमध्ये चढत असताना पँटच्या मागील खिशातील पाकीटात ठेवलेले सात हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरल्याची फिर्याद संजय गोपीनाथ पुठ्ठेवाड रा. होनवडज, ता. मुखेड. जि. नांदेड सध्या रा. शेळगांव (आर) बार्शी यांनी शहर पोलिसात दिली होती.
फिर्यादींनी सांगितलेल्या चोरट्यांच्या वर्णनानुसार शोध घेत असताना संशयीत चोरटे बसस्थानक परिसरातच फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तेथे गेले असता, तीन संशयीत इसम बसमध्ये चढण्याऱ्या प्रवाशांची संशयास्पदरितीने टेहाळणी करताना आढळून आले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांचेकडे चोरीस गेलेली रक्कम मिळून आली, पोलिसांनी ती हस्तगत केली. सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यातील टोळीप्रमुख जमीर उर्फ शौकत जब्बार शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याने अनेक जिल्ह्यात चोऱ्या केलेल्या आहेत.