Theft of three and a half lakhs from Barshi market
बार्शी विशेष : शहराच्या बाजारपेठेत असलेल्या दाणे गल्ली येथून दुकानसमोरील स्कूटीला अडकवलेली ३ लाख ६० हजार रुपयांची पिशवी चोरीला गेली. सोमवार २८ ऑक्टोबर रोजी रात्री १० चे सुमारास ही घटना घडली. याबाबत कांतीलाल शिवलाल मुनोत (वय ७२) रा. कोमल बंगला, छत्रपती कॉलनी, बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुनोत यांची तुळजापूर रस्त्यावरील मार्केट यार्डात एक व दाणे गल्ली येथे एक अशी दोन कृषी साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मार्केट यार्डातील दुकानातून दिवसभरात विक्री झालेली ३ लाख ६० हजार रुपयांची रक्कम त्यांनी पांढऱ्या पिशवीतून एका कामगारामार्फत दाणे गल्ली येथील दुकानात रात्री १० चे सुमारास आणली होती. त्यानंतर दुकानातील चार कामगारांकडून दुकानाची साफसफाई केली. दुकान बंद करायचे असल्याने मुनोत यांनी पैशाची पिशवी दुकानासमोरील स्कूटीच्या हूकला अडकवली. दुकानात जाऊन कामगारांना कुलूप लावण्यास सांगून सुमारे दहा मिनीटांनी ते स्कूटीजवळ आले तेव्हा स्कूटीच्या हूकला अडकवलेली पैशाची पिशवी चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले.
याबाबत अधिक तपास सपोनि वरपे करत आहेत.
