Police administration on 'action mode' because of upcoming assembly elections
बार्शी विशेष : आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व निर्भिडपणे पार पडाव्यात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी बार्शी शहर पोलिस प्रशासन 'अॅक्शन मोड' वर आले असून, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आणखी १३ जणांवर तडीपारीची कारवाई सुरु आहे. १ इसमाविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली असून त्याची सुनावणी सुरु आहे. अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ३२ इसमांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ९३ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये कलम १२६ प्रमाणे ४८१ इसमांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून आणखीन ३५० जणांविरुध्द कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोअधिक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोअधिकारी जालिंदर नालकुल, शहर पोनि बालाजी कुकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि महेश गळगटे, कुंजीर, पोहेकॉ घाडगे, पोकॉ बरबडे, इसमिया बहिरे, पवार, उदार, नितनात यांनी केली.
त्याचप्रमाणे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोणत्याही व्यक्तीने सोशल मिडीयामधून काही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करुन धार्मिक, जातीय, राजकीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचेविरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यादृष्टीने शहरातील व्हॉटस्अप ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्राम यावर शहर पोलिस ठाण्यातील काही अधिकारी व अंमलदार करडी नजर ठेवून आहेत अशी माहिती पोनि बालाजी कुकडे यांनी दिली.
येत्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर पोलिसांनी भारत तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) यांच्यासह शनिवार २६ ऑक्टोबर रोजी शहरातील मुख्य बाजारपेठ, संवेदनशील भाग आणि संमीश्र वस्तीतून पथसंचलन केले.