डोक्यावर प्रहार करुन सोन्याची चेन पळवली; बार्शी बसस्थानकातील घटना

Admin
0
Hit on the head and snatched the gold chain; Incident at Barshi bus stand
Hit on the head and snatched the gold chain; Incident at Barshi bus stand

बार्शी विशेष : लॉटरी तिकीट विक्रेत्याच्या डोक्यावर जड वस्तूचा प्रहार करुन त्याच्या गळ्यातील साडेचार तोळे सोन्याची चेन पळविल्याची घटना बार्शी बस स्थानकावर घडली. अशोक भगवान जगदाळे (वय ६६) रा. जुनी चाटे गल्ली, बार्शी असे या घटनेत जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. 

३ ऑक्टोबर रोजी बार्शी बस स्थानकातील लॉटरी तिकीट विक्री दुकानात जगदाळे बसलेले असताना, दुपारी सव्वा बाराच्या सुमारास डोक्यावर व तोंडावर पांढऱ्या रंगाचा गमचा बांधून आलेल्या ४० ते ४५ वयाच्या एका इसमाने त्यांचेकडून एक लॉटरी तिकीट आणि पाण्याची बाटली खरेदी केली. 

त्यानंतरही तो इसम तेथेच थांबला असल्यामुळे इतर ग्राहकांना अडचण होऊ नये म्हणून जगदाळेंनी त्याला बाहेर थांबण्यास सांगितले. तेव्हा माझा मित्र येणार आहे तो आल्यावर त्याच्या हातून अजून लॉटरी तिकीट घ्यायचे आहे असे सांगून मित्राची वाट बघण्याचा बहाणा करत तो इसम तेथेच थांबला. थोड्या वेळानंतर हातातील मोबाईल बघण्यात जगदाळे व्यस्त असल्याचे बघून, त्या इसमाने तिकीट घेण्याच्या बहाण्याने त्याच्या हातात असलेल्या पिशवीतील जड वस्तूने पिशवीसह जगदाळे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. 

अचानक घडलेल्या प्रकाराने जगदाळे गांगारुन गेले आणि डोक्यातून येत असलेले रक्त पुसत ते ओरडले. तेव्हा त्या इसमाने दुकानासमोर असलेली डस्टबीन त्यांच्या डोक्यावर पालथी घातली आणि त्यांच्या गळ्यात असलेली साडेचार तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून घेतली. त्याचवेळी लोक जमा होत असल्याचे बघून 'दवाखान्यात चला, दवाखान्यात चला' असे म्हणत तो इसम तेथून पसार झाला.

बार्शी शहर पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स.पो.उपनिरिक्षक वरपे करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)