A case has been registered against 22 bogus applications in Ladki Bahin Yojana
बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातून लाडकी बहिण योजनेसाठी ८५ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी काही अर्जाबाबत रहिवास, नाव व आधार क्रमांक याबद्दल शंका उपस्थित झाल्यामुळे त्याची पडताळणी करण्यासाठी ३० ऑक्टोबर रोजी तलाठी, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांची त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली होती.
सदर समितीने गावात जाऊन त्या नावाचे अर्जदार तेथे राहात आहेत किंवा नाहीत याबाबत पंचासमक्ष खात्री करुन, सदर अर्जदार गावातील रहिवासी नसल्याचा अहवाल दिला. त्याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर सदर अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे ब्लर किंवा अस्पष्ट स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक तसेच इतर जिल्ह्यातील असल्याचे सिध्द झाले.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चुकीची व खोटी कागदपत्रे दाखल करुन शासनाच्या कल्याणकारी योजनेचा आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न करुन शासनाची दिशाभूल, फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने सदरील सर्व अर्ज अपात्र करुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तालुकास्तरीय समिती यांचेमार्फत बार्शी शहर पोलिस ठाण्यात ४ ऑक्टोबर रोजी गुन्हा (गुरनं ८४५) दाखल करण्यात आला आहे.
चुकीची व बोगस माहीती सादर करुन लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.