Punishment for the accused under the Atrocity Act
बार्शी विशेष : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळी करुन कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले, आणि फिर्यादीच्या पत्नीस मारहाण, जातीवाचक शिवीगाळी करुन विनयभंग केल्याप्रकरणी सन २०२१ मध्ये बार्शी तालुका पोलीस ठाण्यात, नानासाहेब उर्फ हनुमंत अंकुश आगलावे, वनमाला अंकुश आगलावे, बाबासाहेब अंकुश आलगावे व मनिषा बाबासाहेब आगलावे. सर्व रा. बावी (आ), ता. बार्शी यांचेविरोधात भादवि कलम ३२४, ३५४, ३२३, ५०४, ५०६ सह अनु. जाती व अनु. जमाती कायदा कलम ३(२) इत्यादी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी करुन सबळ पुराव्यानिशी आरोपी विरोधात बार्शीतील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या गुन्ह्याची बार्शी विशेष सत्र न्यायालयासमोर सुनावणी होऊन न्या. आर.एम. कुलकर्णी यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार व साक्षीपुरावे गृहीत धरुन, आरोपी नानासाहेब उर्फ हनुमंत अंकुश आगलावे यांस भादवि कलम ३५४ अन्वये १ वर्ष शिक्षा व दंड, कलम ३२४ अन्वये ६ महिने शिक्षा, तसेच कलम ५०४ अन्वये २ महिने शिक्षा व दंड याप्रमाणे साधी शिक्षा सुनावली, तर वनमाला आगलावे यांची निर्दोष मुक्तता केली. १९ सप्टेंबर २०२४ रोजी हा निकाल देण्यात आला.
या खटल्यात सरकार तर्फे सहा. सरकारी अभियोक्ता दिनेश देशमुख यांनी बाजू मांडली. तर गुन्ह्याचे सुनावणीकामी पो. अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पो. अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पो. अधिकारी जालिंदर नालकुल व बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि मिठू जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी म्हणून सपोउनि विलास मारकड यांनी काम पाहिले.