बार्शीतील व्यापाऱ्याला २१ लाखाला फसवले

Admin
0
Businessman in Barshi duped of Rs 21 lakh

Businessman in Barshi duped of Rs 21 lakh


बार्शी विशेष : जालना येथील दोघांनी बार्शीतील व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या मालाच्या बिलापैकी राहिलेले २१ लाख रुपये देण्यास टाळाटाळ करुन फसवणूक केली. नितीन भारत शेटे (वय ४७) रा. दत्तनगर, बार्शी यांनी यासंदर्भात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

नितीन शेटे यांचे बार्शीतील आडत बाजारात  दुकान असून, अशोका ट्रेडिंग कंपनी, न्यू एपीएमसी मार्केट यार्ड, जालना येथील अतिन अशोक पांगारकर व संतोष अण्णा नवपुते या दोघांची ओळख बार्शी आडत बाजारातील दलाल मल्लीकार्जुन अप्पा तोडकरी यांनी करुन दिली. 

२२ सप्टेंबर ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान अतिन व नवपुते यांनी शेटे यांच्या दुकानातील ५६ लाख ४४ हजार ५६२ रुपये किंमतीचा ज्वारीचा माल विक्री करुन दिला. या कालावधीत अशोका ट्रेडिंग कंपनीच्या बँक खात्यावरुन ३५ लाख ३१ हजार ००७ रुपयांची रक्कम शेटे यांच्या बँक खात्यावर दिली व उर्वरित रक्कम २१ लाख १३ हजार ५५५ रुपये १५ दिवसात देतो असे सांगितले.

पुढे राहिलेल्या रक्कमेबाबत शेटे यांनी विचारणा केली असता कारणे सांगून टाळाटाळ सुरु केली, तसेच रकमेसाठी वारंवार फोन केल्यास ती देणार नाही असे सांगितले. नंतर दोघेही फोन उचलत नसल्यामुळे मे २०२४ मध्ये शेटे यांनी दुकानातील मुनीमासह जालना येथे जाऊन त्यांची समक्ष भेट घेतली, त्यावेळी तुमचे राहिलेले पैसे आम्ही लवकर देतो असे सांगून समजूत काढली. मात्र आत्तापर्यंत राहिलेली रक्कम दिली नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिसांनी अतिन अशोक पांगारकर, रा. बीड-जालना रोड, जालना व संतोष अण्णा नवपुते, रा. जालना या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)