The four unknowns went to the woman's house and beat her up
बार्शी विशेष : तू बचतगटाच्या ऑफिसमध्ये का आलीस म्हणत दोन अनोळखी महिला व दोन अनोळखी पुरुषांनी एका महिलेच्या घरी जाऊन प्लॅस्टिक पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. २६ सप्टेंबरच्या सायंकाळी सातचे सुमारास ही घटना घडली. याबाबत नंदिनी अमोल ढंगे (वय ३०) रा. सुभाषनगर, बार्शी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
२६ सप्टेंबर रोजी फिर्यादी कॅन्सर हॉस्पिटल येथे सुरक्षा रक्षकाच्या कर्तव्यावर असताना, फिर्यादीस १५ दिवसांपूर्वी बचतगटाच्या झालेल्या मिटींगमधील मॅडमचा फोन आला होता का असे हॉस्पिटलमध्ये सफाई काम करणाऱ्या सुलताना शेख यांनी विचारले. त्यावर फिर्यादीने मला नाही आला फोन, तुम्हाला आला होता का म्हणताच, त्या मॅडम आमचा फोन उचलत नाहीत, तू फोन करुन बघ तुझा फोन उचलतात का, असे म्हणून त्या मावशींनी फिर्यादीस फोन नंबर दिला.
दिलेल्या नंबरवर दुपारी चारचे सुमारास फिर्यादीने फोन करुन, मॅडम बचत गटाचे पैसे कधी देणार आहात असे विचारल्यावर महिलेने ऑफिसमधील सराकडे फोन दिला. त्यावर तुम्हाला काय चिंचुके द्यायचे आहेत का असे ते सर म्हणाले. त्यामुळे फोन कट झाल्यावर वैदूवस्ती येथे असलेल्या बचतगटाच्या ऑफिसमध्ये जाऊन, आत्ता कोणते सर बोलले त्यांना माझ्यासमोर आणा असे फिर्यादीने म्हणताच, कुठले सर, कोणते सर, येथे कुणी सर नाहीत तुला काय करायचे ते कर जा असे तेथील एक महिला म्हणाली. तेवढ्यात मॅडम त्या सरांचे चुकले त्यांच्यावतीने मी माफी मागतो असे एक सर म्हणाल्यामुळे फिर्यादी घरी निघून आल्या.
सायंकाळी सातचे सुमारास फिर्यादीच्या घरी येऊन दोन अनोळखी महिला व दोन अनोळखी पुरुषांनी, तू बचतगटाच्या ऑफिसमध्ये का आलीस व आमच्या सरांना का विचारलीस असे म्हणून शिवीगाळी सुरु केली. एका पुरुषाने फिर्यादीचे दोन्ही हात पकडून बाजूला पडलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या पाईपने गालावर मारले, तर दोन महिलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिला का मारता तीचा नवरा येत आहे असे शेजारच्यांनी म्हणताच, कोणाला आणायचे ते आण, तुला बघून घेऊ अशी धमकी देत ते निघून गेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी महिला व दोन अनोळखी पुरुषांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.