अ‍ॅडव्होकेट सिम्बॉल लावलेल्या कारमधून गांजासह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin
0

 

Ganja seized from the car with the advocate symbol

Ganja seized from the car with the advocate symbol

बार्शी विशेष (वैराग) : अ‍ॅडव्होकेट चिन्हाचे स्टिकर लावलेल्या इनोव्हा कारमधून पोलिसांनी १२ लाख रुपयांच्या गांजासह ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाचे सुमारास सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तुळजापूर-बार्शी रस्त्यावरील गौडगांव हद्दीत ही कारवाई केली.

याबाबत माहिती अशी की, एका इनोव्हा कारमधून चार इसम तुळजापूर-बार्शी रस्त्यावरुन अकलूज मार्गे बारामतीकडे गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. 

ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सुरेश निंबाळकर यांच्या सूचनेनुसार, सपोनि विजय शिंदे, पोउनि सुरज निंबाळकर, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, सहाफौ निलकंठ जाधवर, हेकॉ विजयकुमार भरले, सलीम बागवान, हरिदास पांढरे, पोना धनराज गायकवाड, पोकॉ समर्थ गाजरे, यश देवकते, विनायक घोरपडे यांच्या पथकाने पंचासह तुळजापूर बार्शी रस्त्यावरील गौडगांव हद्दीतील रऊळगाव शिव रस्त्याजवळ सापळा लावला.

सायंकाळी साडेसहाचे सुमारास तुळजापूरकडून बार्शीकडे येत असलेल्या चेरी कलरच्या इनोव्हा कारला (क्र. एमएच-१३-सीके-८९९७) पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. पण संशय आल्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी शासकीय वाहने आडवी लावून ती कार अडवली.

सदर कारच्या झडतीमध्ये पोलिसांना मागील सीटखाली गांजा भरलेली पांढऱ्या रंगाची दोन पोती दिसून आली. पंचनामा करुन पोलिसांनी दोन पोत्यामधील मिळून १२ लाख ४२ हजार ७०० रुपये किंमतीचा ६२ किलो १३५ ग्रॅम वजनाचा गांजा, मागील, पुढील काचेवर अ‍ॅडव्होकेट चिन्हाचे स्टिकर लावलेली १६ लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार, कारमधील चार इसमांकडे मिळून आलेले ७२ हजार रुपये किंमतीचे ६ मोबाईल फोन असा मिळून एकूण ३० लाख ४ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोहेकॉ विजयकुमार भरले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धीरज दिलीप मोरे (वय ३१) रा. आंबेडकर चौक, अकलूज, शरद संजय उबाळे (वय ३१) रा. भिमनगर, फळवणी, ता. माळशिरस, समाधान पोपट गायकवाड (वय ३३) रा. पाटबंधारे कॉलनी, भीमानगर, ता. माढा व अमोल राहुल कांबळे (वय ३१) रा. रमामाता नगर, बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे यांचे विरोधात गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८(क), २०(ब), २९ अन्वये वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)