Friendship with a woman on Facebook cost the teacher dearly
बार्शी विशेष : फेसबुकवर महिलेशी मैत्री करणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. १४ तारखेला फ्रेंड रिक्वेस्ट, १५ तारखेला भेटण्याचे आमंत्रण आणि १६ तारखेला भेट होताच लूट. एखाद्या चित्रपटालाही मागे टाकेल इतक्या वेगवानपणे हे नाट्य सोलापूर जिल्ह्यात घडले.
फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेने प्रत्यक्ष भेटायला बोलावले आणि साथीदारांच्या मदतीने मारहाण करुन तिने चार लाखांचा ऐवज लुटल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे घडला. अण्णा मारुती वाघमारे (वय ४६) रा. कोर्टी, ता. पंढरपूर असे लुटले गेलेल्या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ सप्टेंबर रोजी फेसबुकवर स्वाती भोसले नावाने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्विकारली. फेसबुक चॅटींग केल्यानंतर त्यांच्यामध्ये मोबाईलवर व्हॉटसअप चॅटींग सुरु झाले. जवळीक वाढल्याने १५ सप्टेंबर रोजी त्या महिलेने बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे भेटण्यासाठी त्यांना बोलावले. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ चे सुमारास ते स्वतःच्या कार (क्र.एमएच१३-डीएफ-९५५५) मधून मित्रासमवेत कोरफळे येथे त्या महिलेला भेटण्यासाठी गेले.
दुपारी १ चे सुमारास कोरफळे येथील एका बिअर बारजवळ ते दोघे पोहोचल्यावर, त्या महिलेने व्हिडीओ कॉल करुन मित्राला तेथेच सोडून पुढे येण्यास सांगितले. महिलेच्या सांगण्याप्रमाणे मित्राला सोडून पानगांव रस्त्याने पुढे जाऊन स्नेहग्राम शाळेजवळ ते पोहोचले, तेव्हा शाळेमागे ती महिला एकटी उभी असल्याचे दिसले. तिला गाडीमध्ये बसण्यास सांगताच, गाडीजवळ येत त्या महिलेने सच्या, आमल्या असा आवाज देताच पाठीमागून तीन इसम गाडीजवळ आले आणि त्यांना गाडीबाहेर ओढून मारहाण करत एका साथीदाराने जवळच्या झाडाकडे नेले, तर इतर दोन साथीदार गाडीत घुसले. त्यावेळी महिलेने त्यांचेकडील मोबाईल हिसकावून घेतला
त्यांना मारहाण होत असल्याचे बघून तेथे शेळ्या चारणाऱ्या एका इसमाने, आमच्या रानात काय करता म्हणत महिला व तिच्या साथीदारांना दगडे फेकून मारल्याने ते सर्वजण दोन मोटरसायकलवरुन पळून गेले. त्यापैकी गाडीत घुसलेल्या दोघांनी गाडीमधील २ तोळे वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या, ४ तोळे वजनाची सोन्याची चेन, ४ तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, २७ हजार रुपयांच्या पाचशेच्या ५४ नोटा व मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लूटून नेला असे फिर्यादीत म्हटले आहे.
वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी तालुका पोलिसांनी स्वाती भोसले व इतर तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.