Citizens suffering due to the postal department's remarks while delivering letters
बार्शी विशेष : सोलापूरच्या एका दैनिकाने 'योग्य पत्ता नाही; पत्र परत जाणार' पोस्ट खात्याविषयी माहितीवृत्त प्रसिध्द केले, पण प्रत्यक्षात मात्र आधारकार्ड, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र यासारखी महत्वाची कागदपत्रे मिळताना पोस्टखात्याच्या कार्यपध्दतीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसते.
पत्ता व मोबाईल नंबर अचूक असतानाही पोस्ट खात्याने मारलेल्या रिमार्क्समुळे पत्र परत गेल्याचा अनुभव आला. आरटीओ ने स्पीड पोस्टद्वारे पाठविलेला नूतनीकरण केलेला वाहन परवाना मिळण्याची प्रतिक्षा असतानाच, अनपेक्षितपणे २ सप्टेंबर रोजी 'अपूर्ण पत्ता' आणि 'सोलापूर आयसीएच येथे आर्टिकल पोहोचले' या आशयाचे दोन एसएमएस पोस्ट खात्याकडून मिळाले. त्यावरुन ते पत्र त्याच दिवशी बार्शीतून सोलापूरला परत गेल्याचे समजले. परंतु त्यापूर्वी पोस्ट खात्याने मोबाईलवर संपर्कही साधला नव्हता.
याबद्दल पोस्ट खात्याकडे ऑनलाईन तक्रार नोंदविल्यानंतर ते पत्र पुन्हा सोलापूर येथून ३ सप्टेंबर रोजी बार्शीत आले. यावेळी मात्र पोस्ट खात्याने मोबाईलवर संपर्क साधून आणि पत्त्याबाबत चौकशीही न करता ४ सप्टेंबर रोजी पत्र पोहोचविले. तसेच ऑनलाईन अपडेटमध्ये 'इनसफिशिएंट एड्रेस, डोअर लॉक्ड' असे रिमार्क्स मारल्याचे दिसून आले.
खासगी कुरिअर कंपन्यांचे कर्मचारी पत्ता किंवा पिनकोडच्या तांत्रिक मुद्द्यावर अडून न बसता ग्राहकांच्या मोबाईलवर नम्र भाषेत संपर्क साधून तातडीने पत्र, पार्सल वितरीत करतात. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या युगात पोस्ट खात्यानेसुध्दा त्यांच्या सेवा, कार्यपध्दतीत काळानुरुप बदल करावा अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
.jpg)